Take a fresh look at your lifestyle.

पोलीस पाटलांना दिले ग्रामविकासाचे धडे

0

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत : ‘गावात लोकसहभागातून दरवर्षी हरिनाम सप्ताह यशस्वी होऊ शकतो मग गावांच्या विकासाचा सप्ताह का बसु शकत नाही? असा प्रश्न उपस्थित करत यशदाचे जिल्हास्तरीय प्रवीण प्रशिक्षक आशिष बोरा यांनी ‘विकासाची दिशा आणि दशा’ या विषयावर तालुक्यातील पोलीस पाटलांना ग्रामविकासाचे धडे दिले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस ठाण्यात भरवलेल्या पोलीस पाटील यांच्या बैठकीत ते बोलत होते.

भारत स्वतंत्र होऊन ७२ वर्षे झाली. ‘विकास’ या एकाच संकल्पनेवर केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रापंचायती या पाच स्तरांवरून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र अद्यापही सर्वत्र रस्ते, पाणी, वीज व बांधकामे या मूलभूत प्रश्नावरच काम चालत असून अद्यापही गावातील सर्वसामान्य लोक विकासाबाबत समाधानी नाहीत. याचा प्रत्येक गावातील प्रशासनाने, अधिकारी कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सध्या ज्या कार्यपद्धीतीने विकासाकडे वाटचाल सुरू आहे ती दिशा चुकते आहे का? असा प्रश्न उपस्थित करून, शासनाने विविध योजना राबविताना गावातील नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी योजना तयार केली पाहिजे. गावातील तरुणांनी, महिलांनी, सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेऊन विकास म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे. त्यावर कसे काम करता येईल? यावर विचार करायला पाहिजे असे मत व्यक्त करताना विकास करणे म्हणजे फक्त बांधकामे करणे असे नाही हे उदाहरणसह समजून सांगताना विकासाची संकल्पना स्पष्ट केली.

या बैठकीत पोलीस निरीक्षक यादव यांनी प्रत्येक गावात सुरक्षिततेच्यादृष्टीने व गावातील गुन्हे कमी होण्यासाठी गावात सीसीटीव्ही बसवणे आवश्यक असल्याने याबाबत सर्वांकडून आढावा घेतला. बैठकीतूनच त्या-त्या गावाच्या सरपंच, ग्रामसेवकांना फोन लावून याबाबत काम कुठपर्यत आले आहे? याबाबत विचारणा केली. मार्च अखेरपर्यंत आपल्या गावात सीसीटीव्ही बसावेत अशी बोलताना अपेक्षा व्यक्त केली. यावेळी गावांतील इतर प्रश्नावरही चर्चा झाली. बैठकीत आशिष बोरा यांनी मांडलेल्या विचारांबाबत प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असून आपण आपल्या कामाबरोबरच जर असा वेगळा प्रयोग करू शकलो तर गावाच्यादृष्टीने खऱ्या अर्थाने मोलाचे काम होईल’ असे म्हणत पोलीस निरीक्षक यादव यांनी पोलीस पाटलांशी संवाद साधला. यावेळी तालुक्यातील अनेक गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.