Take a fresh look at your lifestyle.

अमित शहांनी समजावूनही राणे नाराजच; भाजपतील गटबाजी कायम

0
maher

न्यूज लाईन नेटवर्क

पणजी : गोव्यातील मुख्यमंत्रिपदाचा पेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समजावणीच्या कथित भाषेने दूर झाला आणि भाजपतील नाराजीनाट्य संपले असे वाटत होते; परंतु अवघ्या दोनच दिवसांत भाजपतील नाराजीनाट्य पुन्हा उफाळून आले आहे. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी निवड जाहीर झाली असली, तरी विश्वजीत राणे अजूनही नाराज आहेत. त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडेच मुख्यमंत्री निवडीचे बोट दाखवले आहे.

तर्कवितर्कांना उधाण

गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले असले तरी मुख्यमंत्रिपदावरून नाराजीनाट्य समोर आले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी पक्ष नेतृत्वाने पुन्हा सावंत यांनाच पसंती दिली आहे. यावरून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले राणे हे नाराज असल्याचे समोर येत आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांवरच राणे भडकले. राणे यांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे बोट दाखवल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राणे भडकले पत्रकारांवर

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा सावंत यांच्या गळ्यात टाकली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी राणे हे स्पर्धेत होते. सावंत यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर काही वेळातच राणे हे थेट राज्यपालांना जाऊन भेटले होते. ही भेट व्यक्तिगत स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या भेटीबद्दल भाजप नेत्यांना काहीही माहिती नव्हती. आता सावंतांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा करताच ते थेट पत्रकारांवरच भडकले.

राणेंची नाराजी कायम

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राणे आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा केली. यावर राणेंचा पारा चढला. ते पत्रकारांवर भडकले. मला असले फालतू प्रश्न विचारू नका, असे त्यांनी सुनावले. मी माझ्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी आलो आहे. असे प्रश्न तुम्ही थेट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाच विचारा, असेही राणेंनी बजावले. यामुळे राणेंची नाराजी समोर आली आहे.

बहुमत असूनही उसळली गटबाजी

गोव्यात विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली आहे. राणे हे आरोग्यमंत्री होते. राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राणेंचे पिता माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे काँग्रेसमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील भाजप सरकारने प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यानंतर प्रतापसिंह राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.

राणे यांच्या निणर्याकडे सर्वांचे लक्ष

राणे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदावर मानले जात आहेत. त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे गोव्यातील राजकारणात अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. यातच मुख्यमंत्रिपदासाठी डावलण्यात आल्याने राणे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पुढील निर्णयाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.