Take a fresh look at your lifestyle.

प्रतीक्षा संपली! उशिरा का होईना, पण उर्वरित 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

लातूर – मागच्या वर्षी शेतकऱ्यांना अवकाळी पावसासह इतरही बर्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. शिवाय, खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) सोयाबीन तसेच इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. ऐन काढणीच्या दरम्यानच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला होता. यांनतर पीक पाहणी करून त्यानुसार पंचनामे करत (Government) सरकारने मदतीची घोषणाही केली होती. महत्वाचं म्हणजे या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालं होतं.

दिवाळी सणादरम्यान, पंचनाम्याच्या एकूण रकमेपैकी 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. मात्र, याच शेतकऱ्यांसाठी उर्वरित रकमेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. कारण आता उर्वरीत 25 टक्के नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. उशिरा का होईना पण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तब्बल 77 हजार 775 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 8 कोटी 29 लाख 66 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

मांजरा-तेरणा प्रकल्पामुळे अधिकचे नुकसान

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून मांजरा आणि तेरणा नदीचा प्रवाह वाहतो. सप्टेंबर महिन्य़ातील अतिवृष्टी दरम्य़ान मांजरा आणि तेरणा नदीचे दरवाजे हे उघडण्यात आले होते. त्यामुळे या नदी पात्रातील पाणी थेट शेतकऱ्यांच्या शिवारात घुसले होते. सोयाबीनसह इतर पिकांचे तर नुकसान झालेच पण शेतजमिनीही खरडूव गेल्याच्या घटना निलंगा तालुक्यात घडल्या होत्या. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार जवळपास 75 हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले होते.त्यानुसार सरकारने दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत कोरडवाहूसाठी हेक्टरी 10 हजार तर बागायतीसाठी 18 हजार व फळबागांसाठी 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती.

उशिरा का होईना मदत शेतकऱ्यांच्या पदरी

पहिल्या टप्प्यात या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 54 कोटी 11 लाख रुपये जमा करण्यात आले होते. मात्र, दीपावली नंतर शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील मदतीची प्रतिक्षा लागली होती. पंधरा दिवसापूर्वीच प्रशासनाकडे ही रक्कम अदा करण्यात आली होती. त्यानंतर तलाठ्यांकडून याद्यांचे संकलन करुन अखेर ही 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. पहिला मान निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला असला तरी उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान

लातूर जिल्हा हा तसा दुष्काळी भाग आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत असल्याने परस्थिती बदलत आहे. शिवाय जिल्ह्यातून मांजरा आणि तेरणा नद्यांचा प्रवाह होतो. मात्र, सलग दुसऱ्या वर्षाी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असतानाच ही परस्थिती ओढावली आणि यामध्ये सर्वाधिक नुकसान नदी लगतच्या शेतकऱ्यांचे झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.