Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता, गांधी कुटुंबाचा बचावही अवघड

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच हाती आले. यातील चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये वर्चस्व राखण्यात भाजपाला यश मिळालं. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवामुळे काँग्रेसच्या गोटात मात्र कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

लवकरच या पराभवांची कारणं आणि येत्या निवडणुकांसाठीची तयारी यावर आत्मचिंतन करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक लवकरच होईल. मात्र, या बैठकीतून काही निष्पन्न होईलच असं नाही, असं मत काँग्रेसच्या अनेक जेष्ठ नेत्यांकडून व्यक्त होतंय. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आता गांधी कुटुंबाचा निभाव लागणार नाही किंवा त्यांचा बचाव करणं हेदेखील अवघड बनलं आहे अशी भावना जेष्ठ नेत्यांमध्ये आहे.

Assembly polls in 5 states including UP, Punjab from Feb 10; Results on March 10

निवडणुकांचे निकाल हाती येताच काँग्रेसचा सरळ सरळ पराभव झाल्याचं लक्षात आलं. कारण निवडणूक झालेल्या ५ राज्यातील विधानसभेच्या एकूण ६९० जागा होत्या. मात्र, काँग्रेस सारख्या पक्षाला यातील केवळ ५५ जागा राखता आल्या. यांपैकी एकट्या उत्तर प्रदेशात असणाऱ्या ४०३ जागांपैकी काँग्रेस जेमतेम दोनच जागा जिंकू शकला, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

दरम्यान, या पराभवाचा मोठा फटका काँग्रेसला बसला असून, त्यामुळे काँग्रेसजनांचा उद्वेग शिगेला पोहोचला असल्याचं चित्र आहे. सध्या देशात काँग्रेस पक्षाची स्थिती हलाखीची आहे हेच या पाच विधानसभा निवडणुकांच्या पराभवाने दाखवून दिलंय. शिवाय काँग्रेसविषयी गंभीर चिंता व्यक्त करणारे असंतुष्ट नेते पाच राज्यांतील मोठ्या पराभवानंतर पुन्हा बंडखोरीच्या मनःस्थितीत असल्याचं दिसतंय.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी कपिल सिब्बल, मनीष तिवारी, आनंद शर्मा यांच्यासह काही नेत्यांनी एकत्र हजेरी लावली. त्यावेळी देशातील काँग्रेसची अवस्था तसेच काँग्रेसच्या भवितव्याविषयी चर्चा केली. मात्र, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटून किंवा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठका करून काहीही साध्य होणार नाही, असंच अनेक नेत्यांचं मत असल्याचं दिसून आलं. काँग्रेस कार्यकारिणीमध्ये आझाद आणि शर्मा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

 

भारतात काँग्रेस पक्ष १३८ वर्षे इतका जुना आहे. आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या त्रिसूत्रीचा हाती पक्षाची सूत्र आहेत. मात्र, असं असल तरी या गांधी कुटुंबीयांचा बचाव करणं देखील काँग्रेस निष्ठावंतांना जड जातंय. इतकंच नव्हे, तर गांधी कुटुंबासोबत दीर्घकाळापासून असलेले निष्ठावंत माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनीही निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच सोनिया गांधी यांची खास भेट घेतली. भेटीदरम्यान, निवडणुक तसेच संसदीय राजकारणातून निवृत्त होत असल्याचं सांगितलं. गांधी कुटुंबच सध्या काँग्रेस पक्षासाठी अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच ‘एनपीए’ असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत.

Congress Must Play its Nehrutva and Priyanka Cards | NewsClick
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या केविलवाण्या पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये बदल अनिवार्य आहे, असं मत पक्षाचे खासदार शशी थरुर यांनी ट्विटरवर व्यक्त केलंय. शिवाय, आतापर्यंत काँग्रेससोबत चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अनेक समविचारी प्रादेशिक पक्षांनी आता काँग्रेससोबत अंतर ठेवायला सुरुवात केली आहे. आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर काँग्रेसने आमच्या पक्षात विलीन व्हायला हवं असा उपरोधिक सल्ला तृणमूल काँग्रेसने दिला आहे.

सध्या निवडणुकांमध्ये सतत होत असलेल्या पराभवांमुळे काँग्रेस पक्ष थट्टेचा विषय ठरत आहे. राजकीय वर्तुळात भारत खरंच काँग्रेसमुक्त होणार का अशा चर्चा जोर धरत आहेत. मुळात या सर्व गोष्टींचं अनेक काँग्रेसजनांना दुःख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.