Take a fresh look at your lifestyle.

गटशेतीच्या माध्यमातून मधमाशीपालन करावे : कुलगुरु डॉ. पाटील

0
maher

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : शास्त्रोक्त मधमाशीपालनाच्या माध्यमातून विविध पिकांमध्ये 30-40 टक्के उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच मधमाशीपालनातून आरोग्यदायी गुणधर्म असलेली अनेक उत्पादने आपल्याला मिळतात. त्यामुळे मधमाशीपालनाकडे एकात्मिक शेतीपध्दतीचा एक भाग म्हणून पाहिले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीतुन मधमाशीपालनाचा व्यवसाय करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार पुरस्कृत पश्चिम महाराष्टामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने मधमाशीपालन, उच्च प्रतीचे मधमाशी बीज केंद्राचा विकास आणि मधुवनस्पती/फुलोरा यांची लागवड या प्रकल्पाअंतर्गत कृषी किटकशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी यांच्याद्वारे सात दिवसीय शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राहुरी, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक व सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चिदानंद पाटील व प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी उपस्थित होते.

या प्रशिक्षणात अनेक तज्ञांनी शास्त्रोक्त मधमाशीपालनाविषयी ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान ज्या त्या भागातील प्रशिक्षणार्थीनी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी उद्यान, मध प्रक्रिया उद्योग तसेच महाबळेश्वर येथील मधमाशी पालन केंद्र व नंदुरबार जिल्ह्यातील कंजाला येथे भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चिदानंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पल्लवी पाळंदे यांनी तर प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून 25 शेतकरी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.