Take a fresh look at your lifestyle.

नॅनो गंधकावर संशोधनासाठी सामंजस्य करार

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई यांच्यामध्ये नॅनो गंधकाचा खत म्हणून वापरासाठीच्या संशोधनासाठी सामंजस्य करार केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथे करण्यात आला. सदर करारावर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील तसेच केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता सक्सेना यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

यावेळी केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोककुमार भारीमल्ला, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, शास्त्रज्ञ डॉ. मनोज महावर व डॉ. अनिल दुरगुडे उपस्थित होते. या करारामध्ये केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई यांनी नॅनो गंधक तयार केले आहे. सदर कराराचा मुख्य उद्देश नॅनो गंधकाचा सोयाबीन या पिकाच्या उत्पादनावर होणारा परिणाम संदर्भात तीन वर्षांसाठी घेण्यात येणार्‍या कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात प्रयोगांचा अभ्यास करणे हा आहे. तेलबिया पिकांसाठी लागणार्‍या गंधकाच्या मात्रा नॅनो खतांच्या माध्यमातून कसा वापरता येईल याबद्दल संशोधन होणार आहे. सदर करार कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला.

या प्रसंगी कुलगुरु डॉ. पाटील यांनी केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथे नॅनो खतांच्या संदर्भातील संशोधन कार्याचे तसेच त्या संस्थेच्या होणार्‍या प्रगतीविषयी प्रशंसा केली. तसेच हा करार शेतकर्‍यांसाठी खूप मोलाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. सक्सेना यांनी याप्रसंगी आपले विचार मांडतांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ करीत असलेल्या विविध क्षेत्रातील संशोधन कार्याचे तसेच प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे मान्य केल्याबद्दल अभिनंदन केले व कुलगुरु डॉ. पाटील व शास्त्रज्ञांचे आभार मानले. यावेळी उपस्थितांचे स्वागत व संशोधनाची रुपरेषा डॉ.भाकरे यांनी विशद केली. तसेच डॉ. दुरगुडे यांनी विद्यापीठामध्ये होत असलेल्या नॅनो खतांच्या संदर्भातील कामाची माहिती उपस्थितांना दिली. केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भारीमल्ला यांनी नॅनो खतांची निर्मिती कशा पध्दतीने केली जाते व त्याची उपयुक्तता शेतकर्‍यांसाठी कशी महत्वाची आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ डॉ. महावर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आचार्य पदवीचे शिक्षण घेणारे व नॅनो खतांवर संशोधन करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.