Take a fresh look at your lifestyle.

कोरोनात मृत्यू; वारसांऐवजी दुसऱ्याच व्यक्तीने लाटले अनुदान

0
maher

अजय टप, ओटीटी न्यूज नेटवर्क

मलकापूर : कोरोना महामारीमध्ये कोरोनाच्या आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा वारस दाखवून मलकापुरातील एका ठगाने महसूल प्रशासन व खऱ्या वारसांना ठगवीत अनुदान लाटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात मृतकाच्या मुलाने तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली असून दीड महिन्यापासून सदर प्रकरण न्यायाच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहे.

यासंदर्भात सविस्तर असे की भीमनगर येथील लिलाबाई पिराजी तायडे या कोरोना महामारीच्या काळात कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांना बुलढाणा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान २ ऑक्टोंबर २०२० रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

शासन आदेशाप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना शासकीय अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मयत महिलेचा मुलगा संजय पिराजी तायडे यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केला. सोबतच वारस म्हणून सर्व कागदपत्रांची पूर्तता सुद्धा केली. परंतु वारस म्हणून संजय तायडे यांना अनुदान प्राप्त न झाल्याने या बाबीची त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्‍ती किंवा नैसर्गिक विभागात चौकशी केली असता त्यांच्या आईच्या नावा वरील अनुदान दुसऱ्याच माणसाने लाटले असल्याची गंभीर बाब समोर आली. निळकंठ वाकोडे नामक व्यक्तीने मंजूर झालेले शासकीय अनुदान खोटे वारसदार दाखवून लाटल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संजय तायडे यांनी सदर प्रकार निवासी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास लेखी निवेदनाद्वारे आणून देत या गैरप्रकार प्रकरणी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता तहसीलदार व शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली. तसेच संपूर्ण कागदपत्रे पुनश्च निवासी जिल्हाधिकारी नैसर्गिक आपत्ती विभागाकडे माहितीस्तव सादर करीत माझी मृतक आई नामे लिलाबाई पिराजी तायडे यांच्या नावाचा गैरवापर करून शासनाला फसविण्याचा तो गंभीर प्रकार घडला आहे त्या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून न्याय देण्याची तसेच आईच्या नावे मंजूर झालेल्या शासकीय अनुदान वारस म्हणून देण्याची मागणी संजय पिराजी तायडे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.