Take a fresh look at your lifestyle.

राहुरीत ३ नायब तहसीलदारांची पदे रिक्त

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : एकीकडे महसूल विभाग नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी आपला विभाग सक्षम करण्याचा प्रयत्न करत असताना राहुरी तहसील कार्यालयामध्ये नायब तहसिलदाराची तब्बल तीन पदे रिक्त असल्याचे दिसून आले असून त्यामुळे अन्य यंत्रणेवर त्याचा ताण पडून याचा परिणाम नागरिकांच्या सुविधांवर पडत असल्याचे चित्र आहे .

सुमारे ९५ गावांचा कारभार असणाऱ्या राहुरी तहसील कार्यालयामध्ये ४ नायब तहसीलदार ही पदे असून त्यामध्ये संजय गांधी योजना (नायब तहसीलदार ), निवासी नायब तहसीलदार, पुरवठा विभाग ( नायब तहसीलदार ) आणि निवडणूक शाखा (नायब तहसीलदार ) अशी ही पदे आहेत. या नायब तहसीलदार पदाच्या माध्यमातून तहसील कार्यालयातील विविध कामांचा निपटारा करण्यात येतो. संजय गांधी योजनेअंतर्गत निवासी नायब तहसीलदार हे योजनेतील नागरिकांच्या विविध कामांची जबाबदारी पार पाडतात. पुरवठा शाखेच्या माध्यमातून नागरिकांच्या शिधा पत्रिका, दुबार शिधापत्रिका व अन्य कामे कामांची जबाबदारी असते. निवडणूक शाखेच्या माध्यमातून तालुक्यातील २३६ मतदान केंद्रांची मधील विविध कामांची जबाबदारी असते. तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार तितकेच महत्त्वाचे पद असते. सध्या राहुरीचे तहसीलदार एफ आर शेख यांची राहुरी येथील तीन वर्षांची कारकीर्द पूर्ण झाली आहे . नायब तहसीलदारपदे रिक्त असल्याने अर्थातच त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आलेली आहे. नायब तहसीलदार पी एम दंडिलेब यांच्याकडेही अतिरिक्त नायब तहसीलदार याचा पदभार असल्याचे सांगण्यात येते. काही जबाबदाऱ्या अक्षरशः अव्वल कारकून पार पडतात ? असेही तहसील कार्यालय आवारात चर्चिले जाते. अव्वल कारकून व अन्य लिपिक कर्मचारी यांच्या पुढील वेगवेगळ्या कामांचा मोठा पसारा असल्याने अतिरिक्त कामाचा त्यांना ही मोठा फटका असल्याचे देखील सांगितले जाते.

एकीकडे महसूल विभाग कामांचा निपटारा करण्यासाठी सक्षम करण्याकडे लक्ष देत असताना नायब तहसीलदार ही महत्त्वाच्या तीन पदे राहुरीत रिक्त असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील महिन्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व सेवेत मोठ्या प्रतीक्षेनंतर आपापल्या पदांवर रुजू झाले. नगर जिल्ह्यातही अशा नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. असे असताना नायब तहसीलदार गणेश तळेकर बदलून गेल्यानंतर त्यांचे पद रिक्त आहे. निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार दुशिंग सेवानिवृत्त झाल्याने तेही पद रिक्त आहे. राहुरी तालुक्याची व्याप्ती पाहता महसूल विभागात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या कामाचा मात्र खोळंबा होत असून राहुरी तहसील कार्यालयाला येथील नायब तहसीलदार यांचे पद कधी भरले जाईल ? याची उत्सुकता मात्र राहुरी तालुक्यातील नागरिकांना लागून राहिली आहे .

राहुरी तालुका हा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा तालुका व मतदारसंघ म्हणून नगर जिल्ह्यासह राज्यात ओळख झालेली आहे. तालुक्यात ९५ गावांसह दोन शहरी भागातील विस्तारलेले नगरपालिका क्षेत्र आहेत. कृषी विद्यापीठाचा विस्तारही तसाच आहे. ना. तनपुरे यांच्या या मतदारसंघातील नागरिकांची तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून अनेक कामे असतात. काही शासकीय कामे जर झाली नाहीत तर ग्रामीण भागातील नागरिकांना नक्कीच हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे राज्यमंत्री तनपुरे यांनीही याबाबतीत लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.