Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ संपादक आनंद आंबेकर ‘ऑन धिस टाईम मीडिया’चे विदर्भ ब्युरो चीफ

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर – संपूर्ण महाराष्ट्रात वाचकप्रिय ठरत असलेल्या ‘ऑन धिस टाईम मीडिया’ डिजिटल मॅगझिनचे विदर्भ ब्युरो चीफ म्हणून ज्येष्ठ संपादक आनंद आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ऑन धिस टाईम मीडिया प्रा.लि. चे अध्यक्ष संदीप थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.9) आनंद आंबेकर यांनी पदभार स्वीकारला.

आनंद आंबेकर यांनी ‘लोकमत’ तसेच ‘सकाळ’ या महाराष्ट्रातील अग्रणी दैनिकात कार्य केले आहे. ‘लोकमत’ मध्ये सन 2000 ते 2012 या काळात उपसंपादक ते मुख्य उपसंपादक चंद्रपूर, गोंदिया, नागपूर येथे जिल्हा प्रतिनिधी, ‘सकाळ’ माध्यम समूहात 2012 ते 2015 या काळात नागपूर येथे सहयोगी संपादक आणि सन 2015 ते 2016 या काळात खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून कार्य केले आहे. यानंतर डिजिटल मीडियामध्ये प्रवेश करीत आय.टी. क्राफ्ट या कंपनीत स्ट्रॅटेजिक हेड म्हणून सन 2016 ते आजतागायत कार्य केले.

पत्रकारितेच्या काळात त्यांचा शोध पत्रकारिता पुरस्काराने दिवंगत सुषमा स्वराज यांच्या हस्ते सन्मान झाला आहे. ‘लोकमत’ गोंदिया येथे त्यांचा ‘चिरफाड’ हा साप्ताहिक स्तंभ बराच गाजला. नक्षलवाद, वन्यजीव आणि सामाजिक घटना हे त्यांचे अभ्यासाचे विषय असून या विषयावरील बातम्या महाराष्ट्रभर गाजल्या आहेत. कोरोनाकाळात नव्या संकल्पनेवर आधारित ‘इंक एन पेन’ पब्लिकेशनद्वारा प्रकाशित ‘अनलॉक’ या दिवाळी अंकाचे त्यांनी संपादन केले असून दोन्ही वर्षी राज्यस्तरावर या अंकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सकारात्मक पत्रकारितेकडे त्यांचा कल असून त्यांच्या कार्यकाळात ‘ऑन धिस टाईम मीडिया’ लोकप्रियतेची नवी उंची गाठेल, असा विश्वास अध्यक्ष संदीप थोरात यांनी व्यक्त केला.

Comments are closed.