Take a fresh look at your lifestyle.

पोलिसांची चौकीतच ओली पार्टी; चार पोलीस कर्मचारी केले निलंबित

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी. के. नगर चौकीत रात्री केलेली ओली पार्टी पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलीच भोवली. पोलीस आयुक्तांनी चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

घरी जाण्याआधी चौकीतच मद्यपान

नाशिकमधील रात्री डी. के. नगर पोलीस चौकीत सागर बोधले, मयूर सिंग, रघुनाथ ठाकूर, नहुश जाधव हे कर्मचारी रात्री काम संपल्यानंतर घरी जाण्याआधी चौकीतच मद्यपानासाठी बसले. चौकीचा दरवाजा त्यांनी आतून बंद केला होता. डी. के. नगर परिसरातील एक रहिवासी टवाळखोर त्रास देत असल्याची तक्रार देण्यासाठी चौकीत गेले. दार बंद असल्याने त्यांनी आवाज दिल्यानंतर पोलिसांनी दार उघडले. त्या वेळी कर्मचारी चौकीतच ओल्या पार्टीत दंग असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी तक्रारदारास आत बोलावून दिवा बंद करून मारहाण केली. त्यांचा आवाज आल्यावर परिसरातील काही जण जमले. एका नागरिकाने हा सर्व प्रकार भ्रमणध्वनीत चित्रित करण्यास सुरुवात केल्यावर एका पोलिसाने शिवीगाळ करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर रहिवाशांनी पाठलाग करत त्याला रोखले. त्याचे चित्रीकरण केल्यानंतर तो चौकीत परत आला. परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणावर चौकीजवळ जमल्याने घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान, मान्यता नसलेल्या चौकी बंद करण्याचा प्रस्ताव पाठविणार आहे. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे आ. सीमा हिरे यांनी सांगितले.

सर्वच पोलीस चौकींचा आढावा घेणार

आयुक्त दीपक पाण्डेय यांनी चारही मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबन केले असून संबंधितांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती दिली. या घटनेविषयी नागरिकांत संताप व्यक्त होत असल्याने बुधवारी आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यास भेट दिली. शहर परिसरातील निरुपयोगी पोलीस चौक्या बंद करण्यात येतील, अशी सूचना दिली.डी. के. नगर पोलीस चौकी बंद करून अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. शहरातील निरुपयोगी चौकींचा गैरवापर वाढत असल्याने अशा सर्व चौकींचा आढावा घेण्यात येणार आहे. केवळ मान्यताप्राप्त चौकी सुरू राहणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.