ओटीटी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विविध वादग्रस्त विधानांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असून त्यांच्यासोबत जणू वादाची मालिकाच जुळली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात शिवरायांसोबत तुलना करणारे विधान केल्याने, राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले होते. यावेळी राज्यपालांनी शिवरायांची तुलना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केल्याने त्यांना अनेकजणांच्या विरोधांचा सामना करावा लागला होता. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
मोठी बातमी: अनिल देशमुखांना जामीन मंजूर; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १३ महिन्यांपासून होते तुरुंगात
ताज्या माहितीनुसार राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले असून पत्रात त्यांनी शिवरायांवरील वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी राज्यपालांनी पत्रात नमूद केले की, “महापुरुषांचा अनादर करण्याबाबत मी स्वप्नातही विचार करू शकत नाही, वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे, म्हणजे महापुरुषांचा अवमान करणे होत नाही” असे राज्यपालांनी पत्रात म्हटले.
उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांवर शरसंधान; समृद्धी महामार्ग लोकार्पण कार्यक्रमावरून उपस्थित केले प्रश्न
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “माझ्या पात्रातील अगदी छोटासा अंश काढून काही लोकांनी त्याचे राजकीय भांडवल केले आहे. मी शिकत असताना महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादींना आम्ही आदर्श मानत होतो जे कायम आदर्शस्थानी आहेत, मात्र हल्लीच्या युगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरीजी हे देखील आदर्श असू शकतात असे मी म्हटले होते”, असा खुलासा राज्यपालांनी पत्राच्या माध्यमाने अमित शहा यांच्याकडे केला आहे. एकंदरीतच हे प्रकरण केंद्र दरबारी पोहचले असून, लवकरच याबाबतीत काहीतरी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.