Take a fresh look at your lifestyle.

ई-वाहन वापरास राज्यात अधिक पसंती; खरेदीत यंदा विक्रमी वाढ

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : हल्ली वाढते प्रदूषण तसेच इंधन तेलाचे वाढते दर बघता जगभरात ई -वाहन पर्यायाचा अवलंब केला जात असताना भारतात देखील दिवसेंदिवस ई-वाहन वापरास अधिक प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे चित्र आहे. याबाबतीत महाराष्ट्र देखील मागे न राहता यंदाच्या जानेवारी ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान राज्यात ई -वाहने खरेदी करण्याच्या प्रमाणात १५७ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. यादरम्यान राज्यात एकूण ८७ हजार ७१८ वाहनांची नोंद झाली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक स्थिती; जीएसटी संकलनाचा आकडा १.५० लक्ष कोटीच्या पार

आतापर्यंत राज्याच्या राजधानीत २५० चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. सध्या सर्वाधिक ई-वाहनांची नोंद पुणे जिल्ह्यात त्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये मध्ये करण्यात आली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात देखील दिवसागणिक ई-वाहन खरेदी व वापरावर भर देण्यात येत असून या शहरात देखील या वाहनांचा आकडा मोठा आहे. वाहनांच्या रचनेनुसार विचार करता यामध्ये दुचाकी, तीन चाकी व चार चाकी अशाप्रकारे समावेश असून ई-वाहनांतर्गत राज्यात सध्या दुचाकी व तीनचाकी वाहने नऊ टक्के असून चारचाकी वाहने ३ टक्के आहे.

गुजरात निवडणूक: भाजपची नवी खेळी; तीन देशातील अल्पसंख्याकांना राज्याचे नागरिकत्व मिळणार

मागील ऑक्टोबर महिन्यात देखील ई -वाहनात मोठ्या प्रमाणात खरेदी वाढली असल्याचा अहवाल असून अधिक जनता स्वस्त व स्वच्छ पर्यावरणपूरक प्रवासाचे साधन म्हणून देखील ई-वाहन खरेदीकडे अधिक वळत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्रामीण भाग वगळता शहरे तसेच महानगरांमध्ये या वाहन वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे, परंतू येत्या काळात ग्रामीण विभागात देखील चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यास येथील जनता देखील ई – वाहन खरेदीचा पर्याय निवडू शकणार आहे. राज्य सरकार लवकरच इलेक्ट्रिक वेहिकल धोरण राबवणार असून या अंतर्गत चार्जिंग स्टेशनचे जाळे अधिक विस्तृत होणार आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच भागात प्रदूषणमुक्त ई – वाहने रस्त्यावर धावताना दिसतील.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.