Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालनासाठी विक्री व्यवस्थापन महत्त्वाचे : डॉ. रसाळ

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : शेळी पालन करण्यासाठी शेळ्यांची निवड, शेळ्यांचा आहार व व्यवस्थापन याचे महत्व अनन्य साधारण आहे. शेळ्यांची तसेच करडांची विक्री वजनावर करणे गरजेचे असून शेळी व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी विक्रीचे व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, पदव्युत्तर महाविद्यालय यांच्यामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत एक दिवसीय किफायतशीर शेळीपालन तंत्र हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. प्रमोद रसाळ बोलत होते. याप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप देवकर, डॉ. बाळासाहेब पाटील, सहाय्यक प्राध्यापक डॉ. योगेश कांदळकर उपस्थित होते.

यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनामध्ये या प्रशिक्षणाचे समन्वयक व अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले यांनी किफायतशीर शेळीपालन तंत्र या विषयावर मार्गदर्शन केले. पशुवैद्यक शास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विष्णू नरवडे यांनी शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन व मेंढी सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश कांदळकर यांनी शेळ्यांचे आहार व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते किफायतशीर शेळीपालन तंत्र या प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले व प्रशिक्षणार्थींना शेळ्यांसाठी प्रथम उपचार पेटी, जंतनाशक औषधे, मिनरल मिश्रण व प्रशिक्षण पुस्तिका देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिनकर कांबळे यांनी शेळीपालनाची उपयुक्तता तसेच शेळ्यांच्या जाती विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब पाटील यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्यातील वरवंडी, खडांबे, डोंगरगण व डिग्रस या गावातील 30 पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्प तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.