Take a fresh look at your lifestyle.

अलर्ट! सोशल मीडियावरच्या टिप्स पाहून शेअर बाजारात गुंतवणूक करताय? मग ‘हे’ वाचाच

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – बऱ्याचदा शेअर मार्केटमध्ये गुंवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, त्यासंबंधी जास्त माहिती किंवा ज्ञान नसल्यामुळे अनेकजण सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या टिप्सच्या आधारे गुंतवणूकल करतात. मात्र, अशा प्रकारच्या सोशल टिप्सचा आधार घेऊन जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केलीत तर तुमचं मोठं नुकसान तसेच फसवणूक देखील होण्याची दाट शक्यता आहे.

सेबीने (भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने) शेअर बाजारातील गैरव्यवहार उघड करण्यासाठी संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे. बाजारातील गैरप्रकार उघड करण्याच्या प्रयत्नात, सेबीने गुजरातमधील अहमदाबाद आणि भावनगर, मध्य प्रदेशातील नीमच, दिल्ली आणि मुंबई येथे विविध ठिकाणी 7 व्यक्ती आणि एका कॉर्पोरेट संस्थेच्या परिसरात छापा टाकत शोध आणि जप्तीची कारवाई केली.

याशिवाय, अशा सोशल मिडीयाच्या माध्यमातून सेबीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्राप्त झालेल्या अशा गुंतवणुकीच्या शिफारशींवर अवलंबून राहू नका. गुंतवणूकदारांनी सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करताना गुंतवणुकीचे निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी.’ असं सेबीने गुंतवणूकदारांसाठी जाहीर केलंय.

दरम्यान, सेबीद्वारे टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींकडून 34 मोबाईल फोन, 6 लॅपटॉप, 4 डेस्कटॉप, 4 टॅबलेट, 2 हार्ड ड्राइव्ह डिस्क आणि 1 पेन ड्राईव्हसह मुद्देमाल आणि कागदपत्रं जप्त केली आहेत. ‘या संस्था 9 टेलिग्राम चॅनेल चालवत असून त्याला आतापर्यंत 5 मिलियनपेक्षा जास्त ग्राहक जोडले गेले आहेत. या ग्राहकांना निवडक तसेच सुचीबद्ध शेअर खरेदी करण्याची शिफारस या संस्थेकडून करण्यात येत होती. अशा शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे कृत्रिमरित्या शेअरचे मूल्य वाढत होते.’

कृत्रिमरीत्या शेअर्सचे मूल्य वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ५ मिलियनहुन अधिक लोक टेलिग्राम चॅनेल ला जोडलेले आहेत. त्यामुळे संस्थेतील व्यक्तींच्या संलग्न संस्थांना त्यांच्याकडे असणारे शेअर्स मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीत विकण्याची संधी मिळाली. ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

सध्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबेलट आदींमधून डेटा, ईमेल आणि इतर कागदपत्रं मिळवली जात आहेत. तसेच पोलिसांकडून याविषयी सविस्तर तपास देखील सुरू आहे. निवडक लिस्टेड कंपन्यांच्या संदर्भात स्टॉकच्या टिप्स आणि गुंतवणुकीविषयी सल्ला असलेले संदेश या संस्थेच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात होते. ही माहिती सेबीला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. मात्र, तरीही गुंतवणूक करताना इतर महत्वाच्या बाबींची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे, असंही सेबीने म्हटलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.