Take a fresh look at your lifestyle.

उधारीचा धंदा केला तर “मस्तानी” खायला महाग व्हाल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदनगर : व्यवसाय हा पैश्याच्या हुकमतीवर चालतो. त्यासाठी व्यावसायिक पोकळ गप्पा आणि डरकाळ्या फोडणारा चालत नाही. व्यवसाय त्याच्या मालकाला नेहमी सांगत असतो. “तू एकतर बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल”. सांगायचं तात्पर्य एकच की, पैश्याला पैसा ओढतो. हाच गुंतवणूक केलेला पैसा जर उधारीत गुंतला असेल तर तुमचा व्यवसाय लवकरच शेवटच्या घटका मोजू शकतो.

सेवा देणे हे प्रतिष्ठेचं लक्षण

काही व्यावसायिक मंडळींना तर उधारीवर माल किंवा सेवा देणे हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं. मित्र, नातेवाईक, जवळचा व्यक्ती यांना जर मी उधारीवर माल नाही दिला तर ते नाराज होतील, माझ्याबद्दल ते सकारात्मक राहणार नाहीत. अशी भावना व्यवसायीच्या मनात येते. अशा व्यावसायिकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. मित्रांनो, एक विचार करा, उधारीवर गुंतलेला पैसा हा तुमची “ब्लॉक करन्सी” आहे.

जुने जाणते व्यावसायिक मंडळी सांगतात की,

हा पैसा तुमच्या व्यावसाच्या चलनात नाहीये आणि त्यामुळे तुमचा व्यावसायिक तोटा होतो, जो परवडणारा नसतो. आज कितीतरी व्यवसाय फक्त उधारी वसूल न झाल्याने बंद पडले आहेत. जुने जाणते व्यावसायिक मंडळी सांगतात की, उधारीचा धंदा केल्यापेक्षा धंदा बंद करून कोणाच्या तरी दारात काम केलेले चांगले.

मस्तानी एक रुपयाला एक मिळते

माझा व्यावसायिक अनुभव असे सांगतो की, समजा तुमची एक लाख रुपये उधारी आहे आणि त्यामागे तुमचे मार्जिन 10 टक्के आहे. म्हणजे 10 हजार एक लाख उधारी असणारे समजा 15-20 लोक आहेत. त्यातून सगळे लोक 100 टक्के रक्कम देत नाहीत, काही तर चक्क बुडवतात. हा आकडा 10 हजारच्या पुढे गेला, तर सर्वात आधी तुमचा नफा बुडाला. मग राहिली मुद्दल. ही मुद्दल अनेक दिवस या लोकांकडे राहते. तिचा आपल्याला काहीही फायदा नसतो. ती जेव्हा वसूल होईल तेव्हा तिचा फायदा होईल. पण जेव्हा ती वसूल होईल तेव्हा कदाचित तुमच्या व्यवसायाची चिता पेटलेली असेल. तुम्ही “मस्तानी” म्हणजे बडीशेपची पुडी खायला महाग व्हाल. (मस्तानी एक रुपयाला एक मिळते) त्यामुळे उशिरा मिळालेला पैसा हा न मिळाल्या सारखाच असतो आणि त्यात तो मिळण्यापेक्षा बुडण्याचा धोका जास्त असतो.

धार मागणार किंवा…

लोकांची मन जपण्याच्या नादात तुम्ही कधीच उधारी वाढून ठेऊ नका. कदाचित उधार मागणार किंवा अपेक्षा ठेवणारा तुमच्यावर नाराज होईल, होऊ द्या. मी असे सांगेन की, बायकोचा भाऊ जरी दुकानात शिरला तरी आधी पैसे घ्या. तुमचं नातं सासुरवाडीत राहू द्या, दुकानात नाही. तुम्ही मात्र उधारीवर सेवा, माल न देण्यावर ठाम रहा. कारण ती तुमची नाही तर तुमच्या व्यवसायाची गरज आहे आणि व्यवसायीच्या गरजा भागविणे हे व्यावसायिकांचे काम आहे.

(टीप – “उधारी बंद आहे” असे बोर्ड लावणारे पण धुतल्या तांदळाचे नसतात बरंका, यांची पण उधारी मार्केटमध्ये आहे. 😂)

संदीप थोरात
मो. 95529 83204
(धंद्याचे छक्के पंजे)

Leave A Reply

Your email address will not be published.