Take a fresh look at your lifestyle.

दूध व्यवसायात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर कसे गेले ? : डॉ. वार्ष्णेय

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : गेल्या वीस वर्षांपासून जगात क्रमांक एकवर असणारा भारतातील दुग्ध व्यवसाय भरभराटीला जात असताना गेल्या ७ वर्षात आपल्याच देशात चौथ्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर कसा गेला ? महाराष्ट्रातील दूध व्यवस्थापनाला मोठा डाग असल्याची खंत ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ व आनंद कृषी विद्यापीठ (गुजरात ) चे माजी कुलगुरू डॉ. मदन गोपाल वार्ष्णेय यांनी देवळाली प्रवरा येथे व्यक्त केली.

कै.अण्णासाहेब कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शेतकरी प्रबोधन मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वार्ष्णेय बोलत होते. आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठाणने आयोजित केलेल्या दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यात त्यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या बी.एम.सी.सी.चे माजी प्राचार्य डॉ.मुकुंदराव तापकीर होते. डॉ. वार्ष्णेय म्हणाले की, जगात दूध उत्पादन वाढीचा दर केवळ 1.3 इतका असून हाच दर भारतात 6.5 टक्के म्हणजे जगाच्या तुलनेत चौपट इतका आहे. वर्षाला 208 मिलियन टन इतके दूध उत्पादन भारतात होते.त्यातून 7.3 लाख करोड रुपये आपल्या अर्थव्यवस्थेत भर पडत आहे. दूध व्यवसायाला पूर्वी शेतीपूरक व्यवसाय असे म्हटले जायचे मात्र आज हाच स्वतंत्र व उत्तम असा व्यवसाय बनलेला आहे. बाहेरच्या परदेशी गायांपासून बनणाऱ्या संकरित जातीमुळे भावी पिढीला अनेक दुष्परिणाम भोगण्यापेक्षा आपल्याच देशातील गीर, साहीवाल, लाल सिंधी, डांगी,लाल कंधारी, खिलार अशा 40 हून अधिक देशी गाई दूध उत्पादकांनी जोपासली पाहिजे. यात आपल्या राज्यातील सांगली सातारच्या खिलार जातीची देशी गाई आपला गौरव असून ब्राझीलमध्ये भारतीय वंशाच्या गीर गाईवर संशोधन करुन ती ८५ लिटर दूध देण्याइतकी समृद्ध बनवली. मात्र आम्ही आमच्या गायींची गुणवत्ता तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून घसरवली आहे. ती सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता वार्ष्णेय यांनी प्रतिपादन केली. याच देशी गाईंमुळे आपली पुढची पिढी बलवान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

भारतात दुधाचा सर्वात मोठा दोष हा दुधातील भेसळ असून हे प्रमाण देशात 68% आहे हे एक भयाण वास्तव आहे. भेसळयुक्त दुधाची पावडर बाहेरच्या देशात सपशेल नाकारतात. गुजरातमधील आनंद विद्यापीठात दुग्ध क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्या नंतर आपण कुलगुरुपदी कार्यरत असताना दूध भेसळ ओळखण्यासाठी चे एक प्रोजेक्ट तयार करून तिचे पेटंटही मिळवले होते. त्यात भेसळ ओळखणाऱ्या आठ पद्धतीची भेसळ अवघ्या एक रुपयात ओळखण्याचे सोपे व चांगले तंत्रज्ञान विकसित केले होते .यासाठी महाराष्ट्रातील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते मात्र गुजरात आणि महाराष्ट्रातील राजकारणाची आडकाठी त्याला आल्याची खंत डॉक्टर वार्ष्णेय यांनी यावेळी व्यक्त केली.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रा.स्व.संघाचे प.महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव हे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील कृषी व दुग्ध व्यवसायाशी संबंधित अनेक मान्यवर अतिथी व शेतकरी बांधव उपस्थित होते. सकाळी देवळाली चौकातील आण्णासाहेब कदम यांचा पुतळा व लक्ष्मण बागेतील स्मृतिस्थळावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पांजली वहाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष भवानराव थोरात यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन मृणालिनी काळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.