Take a fresh look at your lifestyle.

सततच्या सरावाने नेतृत्व गुणांचा विकास : डॉ. गडाख

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : आपल्यामध्ये नेतृत्वगुण व वेळेचे व्यवस्थापन हे गुण असणे गरचेजे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट समोर ठेवला तर आपल्यामध्ये नेतृत्व व संघटनात्मक गुण कसे असावे आणि वेळ व्यवस्थापन कसे असावे हे शिकण्यास मिळते. आपल्या कामात शिस्त, निस्वार्थीपणा, सातत्य, नियोजन, वेळव्यवस्थापन असले तर आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त होते. या गुणांचा सतत सराव केला तर आपल्यामध्ये नेतृत्व गुण विकसीत होण्यास मदत होते असे प्रतिपादन संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विस्तार व संज्ञापन विभाग व आनंद गुजरात येथील विस्तार शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ शास्त्रज्ञांसाठी नेतृत्वगुणांचा विकास व संघटनात्मक कार्यासाठीची कौशल्ये या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी डॉ. गडाख बोलत होते. याप्रसंगी माजी कृषी विस्तार विभाग प्रमुख डॉ. सुभाषचंद्र शिंदे, कृषि विस्तार विभागाचे प्राध्यापक डॉ. जी.के. ससाणे, आनंद, गुजरात येथील विस्तार शिक्षण संस्थेचे ए.पी. नीनामा, डॉ. केयुर गरधारीया व व्ही.जे. पटेल उपस्थित होते.

डॉ. शरद गडाख पुढे म्हणाले या धकाधकीच्या जीवनामध्ये ताण व्यवस्थापन करायचे असेल तर एक खेळ किंंवा छंद जोपासणे गरजेचे आहे. काम करत असतांना दुसर्‍यांचे कामांचे कौतुक करणे, दुसर्‍यांना मदतीचा हात देणे, दुसर्‍यांचे दुःख समजुन घेणे यामुळे आपल्या कार्याच्या ठिकाणी चांगल्या वातावरणाची निर्मिती होते. हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होते. यावेळी निनामा म्हणाले जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नेवृत्व गुण व संघटनात्मक कौशल्य गरजेचे आहे. यामुळे आपल्याला आपले ध्येय प्राप्त होते. डॉ. शिंदे म्हणाले या प्रकारच्या प्रशिक्षणामुळे आपल्यामध्ये वेगवेगळे कौशल्याची निर्मिती होवून आपण हाती घेतलेल्या कामामध्ये यश प्राप्त होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रा. गुंड, डॉ. सखेचंद अनारसे व प्रा. किर्ती भांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. आनंद चवई यांनी केले. या प्रशिक्षणास विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.