Take a fresh look at your lifestyle.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेची सहविचार सभा संपन्‍न

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

लोणी : गुणवत्‍तापूर्ण शिक्षणाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने शिक्षणाचा मुलभूत पाया विकसीत करावा लागेल. भविष्‍यात परदेशी विद्यापीठांशीच आपली स्‍पर्धा आहे. यासाठी नव्या राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार कृतीत उतरवूनच शैक्षणिक संस्‍थाना मार्गक्रमण करावे लागेल असे मत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे चेअरमन आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेची सहविचार सभा आ. विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, संस्‍थेचे नवनियुक्‍त संचालक निवृत्‍त सनदी आधिकारी शिवाजीराव जोंधळे, आण्‍णासाहेब भोसले, डॉ.भास्‍करराव खर्डे, शांतीनाथ आहेर, दत्‍त पाटील शिरसाठ, मच्छिंद्र पावडे, भाऊसाहेब ज-हाड, रोहीणी निघुते, अॅड.पोपटराव वाणी, किशोर नावंदर, संस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण आधिकारी लिलावती सरोदे आदि याप्रसंगी उपस्थित होते. या सहविचार सभेच्‍या निमित्‍ताने विविध क्षेत्रात पीएचडी प्राप्‍त प्राध्‍यापकांचा सन्‍मान तसेच निवृत्‍त सेवकांचा कृतज्ञता सोहळा संपन्‍न झाला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, इंग्रजी भाषेचा आग्रह पद्मश्रींनी १९६४ सालीच धरला. अतिशय दुरदृष्‍टीने त्‍यांनी मानलेला विचार आज सर्वांनी स्विकारला. काळाच्‍या ओघात शिक्षण व्यवस्‍‍थेमध्‍ये झालेले बदल सर्वांनाच स्विकारणे भाग पडले. हीच परिस्थिती अभियांत्रिकी शिक्षणाच्‍या वेळी निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करताना झाली होती. परंतू पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करुन त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग मोकळा करुन दिला. याचे सकारात्‍मक परिणाम आपल्‍याला आज पाहायला मिळत आहेत. प्रवरा शिक्षण संकूलातून शिक्षण घेवून बाहेर गेलेले विद्यार्थी जगाच्‍या कानाकोप-यात विविध क्षेत्रात करीत असलेले यशस्‍वी काम हीच खरी प्रवरा संस्‍थेची उपलब्‍धी आहे असे त्‍यांनी नमूद केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने नेहमीच नव्‍या बदलांचा स्विकार करुन, मार्गक्रमन केले आहे. येणा-या काळात स्‍पर्धा परिक्षांचा प्रवरा पॅटर्न सुरु करतानाच संस्‍थेचे प्रत्‍येक शाळा आणि महाविद्यालय डिजीटल करुन, विद्यार्थ्‍यांसाठी मोफत अभ्‍यासिकेची उभारणी करण्‍याची घोषणा आ.विखे पाटील यांनी या सहविचार सभेमध्‍ये केली. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी संस्‍थेच्‍या वाटचालीचा इतिहास विषद करुन, कोव्‍हीड संकटातही संस्‍थेतील शिक्षक आणि प्राध्‍यापकांनी विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नूकसान होवू नये म्‍हणून घेतलेल्‍या परिश्रमाचे कौतूक केले. प्रास्‍ताविक शिक्षणाधिकारी सरोदे यांनी केले तर आभार सहसचिव घोगरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.