Take a fresh look at your lifestyle.

नेवासा खुर्द केंद्राचे शाळापूर्व तयारी प्रशिक्षण संपन्न

0

गुरुप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासे : शाळापूर्व तयारीसाठी दाखलपात्र विदयार्थी, माता पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून तयारी करून घेतल्यास कोरोनाच्या काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून येईल असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी केले.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा यांच्यावतीने आयोजित केलेल्या नेवासा खुर्द केंद्राच्या शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यामध्ये नेवासा खुर्द केंद्रातील १३ जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, दाखल पात्र विद्यार्थी तसेच महिला पालक या वेळी उपस्थित होते.

प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणाचे प्रास्ताविक प्रभारी विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख भाऊसाहेब जगताप यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व प्रशिक्षणाचा उद्देश तज्ञ मार्गदर्शक बाबाजी सांगळे यांनी यावेळी सांगितला. प्रशिक्षण वर्गास तज्न मार्गदर्शक शिक्षक राहुल आठरे यांनी शाळा पूर्व तयारी मेळावे घेण्याची कार्यपद्धती, विविध सात स्टॉल, बालकाच्या पालकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सुप्रिया झिंजुर्डे यांनी स्वरचित गायलेल्या शाळा प्रवेशोत्सव गीताने दाखल पात्र मुलांची फेरी काढण्यात आली.

मेळाव्यामध्ये पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या दाखलपात्र नवगतांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. विकास पत्र भरून घेतल्यानंतर “मी प्रवेश घेतलाय जिल्हा परिषद शाळेत” या आशयाचे बनवलेले सेल्फी पॉइंट सर्वांचे आकर्षण बिंदू ठरला. विविध स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या भावनिक , सामाजिक विकासात्मक, भाषिक गणन पूर्व तयारी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास असे विविध खेळ खेळल्यानंतर त्याला शेवटच्या स्टॉलवर अभिनंदनाचे प्रमाणपत्र देऊन बक्षीस दिले गेले. यावेळी उपस्थित असलेल्या मातांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा ठुबे, अरविंद घोडके, विषय तज्न समी शेख, महादेव घोडके, शिक्षक संदीप जंगले, आण्णासाहेब शिंदे, साईनाथ वडते, संतोष भांबरे, अशोक कुटे, विक्रम गोसावी, शिक्षिका मिनाक्षी अवचरे, अश्विनी मोरे, अंगणवाडी सेविका सुवर्णा गायकवाड, नंदा उगले, मंगल भाकरे, मनब्बी शेख आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.