Take a fresh look at your lifestyle.

रजनी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी; काँग्रेसच्या गोव्यातील पराभवाचा घेणार आढावा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या इतिहासात काँग्रेसची एवढी लाजिरवाणी कामगिरी कधीच झाली नव्हती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर अध्यक्ष सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये आल्या असून, त्यांनी पाचही राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेतले आहेत. आता पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. गोव्याची जबाबदारी खासदार रजनी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेणार आढावा

खा. पाटील या गांधी घराण्याशी जवळीक असलेल्या आहेत. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींचा पूर्ण विश्वास आहे. सोनिया यांनी पाचही राज्यांमधील निवडणुकीनंतरच्या पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाच नेत्यांवर प्रत्येकी एका राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाच नेत्यांमध्ये पाटील यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यावर मणिपूर, अजय माकन यांच्याकडे पंजाब, जितेंद्र सिंग यांच्याकडे उत्तर प्रदेश तर अविनाश पांडे यांच्या उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते संबंधित राज्यांमध्ये जाऊन तेथील पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतील. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली.

रजनी पाटील यांनी जिंकले उपराष्ट्रपतींचे मन!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा पाटील यांनी राज्यसभेत उपस्थित केला. या वेळी त्यांनी थेट उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनाच साकडे घातले. ‘तुम्ही तुमचे वजन वापरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मोदी सरकारला सूचना द्या,’ अशी विनंती पाटील यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर नायडू यांनीही मराठीतूनच ‘तुम्ही चांगलं बोलला,’ असे म्हणत पाटील यांना दाद दिली. सभागृहातील इतर सदस्यांनीही मग बाके वाजवत पाटील यांच्या भाषणांच कौतुक केले .

सभागृहात हास्याची लकेर

पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत थेट नायडू यांना साकडे घातले. आपल्या मुद्याच्या समारोपात पाटील नायडू यांना म्हणाल्या, की तुम्ही ज्ञानी आहात. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नही करत असता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी तुम्ही आपले ‘वजन’ वापरून केंद्राला तशी सूचना करावी, अशी विनंती पाटील यांनी केली. त्यांच्या या टिप्पणीवर सभागृहात हास्याची लकेर उमटली. पाटील यांच्या या वजनदार भाषणाचे नायडू यांनीही कौतुक केले. नायडू यांनी मराठीतूनच दाद देताना म्हटले, की तुमचे अभिनंदन. तुम्ही चांगले बोलला आहात. यावरही सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून पाटील यांना दाद दिली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.