Take a fresh look at your lifestyle.

गृहमंत्र्यांच्या तालुक्यात फुटली राष्ट्रवादी काँग्रेसची मते; शिवसेनेचे उमेदवार पराभूत, तरी मते फोडण्यात यशस्वी

0

न्यूज लाईन नेटवर्क

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्य पक्षीय नेते प्रवेश करीत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडे निवडणूक जिंकण्यापेक्षा कितीतरी जास्त मते असले, तरी त्यांची मते फुटतात. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मते फुटली.

संघाच्या अध्यक्षांची मते फुटली

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील ‘अ’ वर्ग संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे हे विजयी झाले. त्यांना ३५ मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना अ वर्गात १२ मते, तर इतर मागास प्रवर्गातून तब्बल २२ मते मिळाली आहेत. गिरे यांना मिळालेली मते पाहता दक्षता घेऊन खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातच राष्ट्रवादीची मते फुटली.

अपेक्षेपेक्षा फारच कमी मते

आंबेगाव तालुका सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. हिंगे गेली ३२ वर्षे दूध संघावर संचालक आहेत. संघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. हिंगे यांनी या निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. मतदारांमध्ये बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. हिंगे यांचा विजय निश्चित होता. तालुक्यातील ४७ पैकी ४० ते ४२ मते हिंगे यांना मिळतील, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज होता; पण हिंगे यांना ३५, तर गिरे यांना १२ मते मिळाली. इतर मागासवर्ग मतदार संघातही आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचे अरुण गिरे यांना २२, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊ देवाडे यांना २४ मते मिळाली आहेत.

प्रयत्न न करताही गिरेंना जास्त मते

आंबेगाव तालुक्यातील अ गटावर मजबूत पकड असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनाच्या बैठका घेतल्या. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जोरदार प्रचारही राबवला जात होता. मतदानाच्या एक दिवस अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसने काही मतदारांना लोणावळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी सहलीला नेले होते. त्या ठिकाणी वळसे पाटील यांनी मतदार व कार्यकर्त्यांना एकत्रित मार्गदर्शन केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामानाने शिवसेनेच्या गोटात मतदानाच्या दिवसापर्यंत शांतता होती, त्यामुळेच गिरे यांना पडलेल्या मतांची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या कारणांमुळे गिरेंना अधिक मते

अ वर्गातून गिरे यांना १२ मते पडली, तर इतर मागास प्रवर्गात २२ मते पडली, यावरून गिरे यांचे म्हणणे आहे, की अ वर्गातही मला चांगली मते पडायला हवी होती; पण अपेक्षेपेक्षा कमी मते पडली असल्याचे त्यांनी सांगितले. गिरे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे त्यांचे आजही अनेकांशी मैत्रीचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक संपर्कामुळे इतर मागास प्रवर्गात त्यांना आंबेगावातून अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले असावे, अशीही चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीतील काहींची गद्दारी

विरोधकांची तीन मते होती, त्यांना सूचकही मिळत नव्हता. तालुक्यातील ४५ मते राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारी होती; पण राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच काहींनी गद्दारी केली आहे. सहा ते सात मते फुटली आहेत. याबाबतचा अहवाल गृहमंत्री वळसे पाटील यांना देणार आहे, अशी माहिती हिंगे यांनी विजयानंतर सांगितले.

प्रस्थापितांच्या विरोधात मतदान झाले

शिवसेना पक्ष व माझ्या व्यक्तिगत संबंधामुळे मला अपेक्षित मतदान मिळाले आहे. जिल्ह्यातून व आंबेगाव तालुक्यातून दोन ठिकाणी उभा होतो. मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात मला मतदान केले आहे, असे शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.