Take a fresh look at your lifestyle.

मुंढे साहेब, आपले चुकलेच.. !

0
maher

प्रशासनातले नीडर अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आय ए.एस. अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांचा 3 जून रोजी वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्याविषयीच्या सामान्य व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना या पत्राच्या माध्यमातून मांडल्या आहेत. अवश्य वाचा….

पत्रास कारण की…!

मुंढे साहेब, आपले चुकलेच…!

श्री. तुकाराम मुंढे सर,
स.न.वि.वि.

पत्रास कारण की, आज आपला वाढदिवस. इतरांच्या वाढदिवसासारखा तो माझ्या लक्षात राहण्याचे कारण फेसबुकचे नोटीफिकेशन नक्कीच नाही. आपला वाढदिवस कायम माझ्या लक्षात राहतो, कारण आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी लावलेली रीघ मी अनुभवलीय. यात नवल काही नाही;पण या रांगेत असणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यावर मनापासून प्रेम करणारा होता. शुभेच्छा देण्यासाठी आलेला कुणीही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थापोटी आलेला नव्हता; तर तो या भ्रष्ट व्यवस्थेत एक आशेचा किरण म्हणून तुमच्याकडे बघत होता. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेवरील रामबाण उपाय म्हणून त्यांनी आपल्यावर विश्वास टाकला होता; या विश्वासाची ती गर्दी होती. साहेब, आपल्यावर, आपल्या कार्यशैलीवर जीवापाड प्रेम करणारी ही सामान्य माणसे होती.

साहेब, मला आश्चर्य याचंच वाटतं, की ही माणसे एखाद्य अधिकाऱ्यावर इतकं प्रेम कसं करू शकतात…? सरकारी कार्यालयात, त्यातल्या त्यात महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत माझ्यासारख्या सामान्य माणसाला कशा खस्ता खाव्या लागतात, हे साधे कोव्हिड काळात दिवंगत मित्राचे मृत्युपत्र घेताना अनुभवले. मृत्यूचे प्रमाण देणाऱ्या कागदाला ‘अर्जंट’ मिळविण्यासाठीही चिरीमिरी द्यावी लागते, इतकी ही यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली आहे. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचा एक रुपया उचलून फुटाणे खाण्यासाठी ही व्यवस्थेतील माणसे मागेपुढे पाहणार नाही, अशा व्यवस्थेतील नोकरशहांना केवळ तुमच्या नावाने हादरवले, हीच आमच्यासारख्या सामान्य माणसांची ‘जीत’ होती.

साहेब, आपण जेव्हा शहरात निघायचे तेव्हा आपले ‘दर्शन’ व्हावे…हो हो.. मुद्दाम दर्शन हा शब्द येथे वापरतोय, कारण आपण आम्हा सामान्य माणसांसाठी कुठल्याही देवापेक्षा कमी नव्हता… म्हणूनच आपले दर्शन घेण्यासाठी नागरिक अक्षरशः गर्दी करायचे. आपली उपस्थिती अतिक्रमण काढण्यास पुरेशी होती. मनपाच्या बुलडोझरचे काम आपली उपस्थितीच करून जायची. दरवर्षी गाजावाजा करून शहरातील नद्या स्वच्छ केल्या जातात; आपण कुठलाही गाजावाजा न करता दरवर्षी होणाऱ्या खर्चापेक्षा निम्म्याहूनही कमी खर्चात नदी स्वच्छतेची किमया करून दाखवली, ज्याची दखल खुद्द राज्याच्या पर्यटन मंत्र्यानी घेतली. कोव्हिड काळातही कुठलाही बडेजाव न करता कोव्हिड नियंत्रणासाठी आपण केलेले नियोजन आणि व्यवस्थापन नागपूरकरांनी याचि डोळा अनुभवले. नगरसेवकाकडे दहा चकरा मारून न सुटणाऱ्या समस्याच आपल्या ‘लाईव्ह अँप’ वरून 24 तासात सुटू लागल्या. आरोग्य यंत्रणा आपण सक्षम केली. मोठमोठी कामं पूर्ण केलीत.

तुमच्या जिल्ह्याचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

साहेब, इथेच आपलं चुकलं. आपल्या कार्यकुशलतेने आपण जनमनाचा ठाव घेतला खरा, पण इथूनच खरी राजकीय पोददुखी सुरू झाली. राजकीय व्यक्तींचे काम जर अधिकारी करायला लागला तर कसे होईल, या भीतीने आपण जिथं जिथं काम केलं तिथलं राजकीय क्षेत्र हादरलं. प्रत्येक ठिकाणी राजकीय नेते विरुद्ध तुकाराम मुंढे असा सामना नागरिकांनी अनुभवला. खरा तर हा सामना आपल्याविरुद्ध नव्हताच; तो होता राजकीय नेते विरुद्ध अस्तित्त्वाची भीती.

साहेब, तुकाराम मुंढे या नावाने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि म्हणूनच नाशिक असो, नवी मुंबई असो की नागपूर असो, आपल्याला हटविण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली. ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ चांगलाच रंगला. त्या-त्या वेळच्या मुख्यमंत्र्याना यात हस्तक्षेप करावा लागणे, हे त्यांचे अपयश तर आपल्यातील कुशल प्रशासकाचे यश होते, असे आम्ही अभिमानाने म्हणतो.

साहेब, आपली बदली झाली म्हणजे आपण हरलात, असे मुळीच नाही. उलट ती आपल्या उत्तम, जनताभिमुख कार्याची पावतीच होती. आपण अल्पावधीत जे-जे शहर सोडले; ते सोडताना नागरिकांनी आपल्या घरासमोर केलेली गर्दी, गाळलेले अश्रू, आपण जाऊ नये यासाठी गाडीपुढे घातलेले लोटांगण ही आपल्यावरील, आपल्या जनाभिमुख कार्यावरील प्रेमाची साक्षच नव्हे तर काय…!

साहेब, या शासनाला शिस्तीत असणारा, प्रामाणिक असलेला अधिकारीच नको आहे. आपल्याला ‘साईड पोस्टिंग’ देऊन हे त्यांनी सिद्ध केलंय. पण साहेब, आम्हाला विश्वास आहे, आपण जिथे जाल, तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटवाल. आपण तरुणांचे प्रेरणास्थान, सामान्यांचे आशास्थान आहात. आपल्यासारख्या अधिकाऱ्यांसोबत ही जनता कायम राहील, हा विश्वास देतो.

आपलाच
-आनंद आंबेकर, नागपूर
(लेखक ऑन धिस टाईम चे विदर्भ ब्यूरो चीफ आहेत.)
(9527002188)

Leave A Reply

Your email address will not be published.